बिल मंजुरीसाठी मागितली लाच
भंडारा शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
दिनांक,०१ मार्च २०२५
जलशुद्धीकरणाच्या कामांचे बील मंजूर करण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या प्रभारी उपअभियंत्याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२८) जिल्हा परिषद आवारात करण्यात आली. सुहास पांडुरंग करंजेकर (वय ५१) असे लाचखोर प्रभारी उपअभियंत्याचे नाव आहे. तो यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद येथे कार्यरत आहे.
यातील तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. त्यांनी जलशुद्धीकरण संदर्भातील चिखली आणि लेंडेझरी या दोन गावातील कामे पूर्ण केली होती. सदर कामाचे बिल ९ लाख ८० हजार रुपये होते. ते बिल मंजूर होण्यासाठी कंत्राटदार यांनी दोन्ही ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, वर्कऑर्डर, कामाचे छायाचित्र व इतर कागदपत्रासह सुहास करंजेकर याच्याकडे सादर केले होते.
१७ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी करंजेकर याला भेटून त्यांच्या बिलाबाबत विचारणा केली असता त्याने बिलावर सही करून बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या पाच टक्के रक्कम, ४९ हजार रुपये लाचेची मागणी केली. कंत्राटदाराने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीवरून २५ फेबु्रवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपी करंजेकर याने तडजोडअंती ४० हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले.
शुक्रवारी सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास करंजेकर याने पंचासमक्ष कंत्राटदाराकडून ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करण्यात येणार आहे.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस उपअधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, विष्णू वरठी, नरेंद्र लाखडे यांनी केली.