एनएनटीआर च्या जंगलात NT-2 वाघिणीच्या छाव्यांचा खेळ

Shabd Sandesh
0

◾️ट्रॅप कॅमेर्‍यातून तीन पिल्लांचा शोध

◾️ व्याघ्र संवर्धनात महत्त्वपूर्ण यश

      शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
      गोंदिया, दी.१२
      
       नवेगाव-नागझिऱ्यात गेल्या काळात अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला असताना आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून खुशखबर आली आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिले असून आपल्या आईसह रानगव्याच्या  शिकारीनंतरचा फोटो ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश आले आहे. 

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR), गोंदिया येथे व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण, (Tiger Conservation Translocation) उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण 3 वाघीन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये NT-1 व NT-2 ह्या वाघीनीला 20 मे 2023 रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये NT-3 या वाघीनीला 11 एप्रिल 2024 ला नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये NT-2 वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपली जागा निर्माण केली आणि आता सद्यास्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा NT-2 वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये NT-2 वाघिणीचे प्रथमतःच तिच्या 3 छाव्यांसोबत रानगव्याच्या शिकारीवर फोटो प्राप्त झाला आहे. सद्या निसर्गमुक्त केलेल्या 3 वाघीनीपैकी 2 वाघीन ने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे. तेव्हा NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. ज्यामध्ये Command & Control Room चा महत्वाचा वाटा आहे. तसेच या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पुर्व) नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदियाचे क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर. (भावसे) , साकोलीचे उपसंचालक पवन जेफ (भावसे), उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई (भावसे), विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, व्ही. के. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, दिलीप कौशीक व वनविभागातील इतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

◾️प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश...

NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. दरम्यान, NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. 

 - पवन जेफ, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र, साकोली

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)