दिघोरी/मोठी ठाणे अंतर्गत;साकोली-लाखांदूर मुख्य मार्गावरील घटना
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
दिघोरी/मोठी दि. १७ डिसेंबर २०२४
दिघोरी/मोठी येथील पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पिकअप वाहनातून मुक्या प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, येथिल पोलीस वाहन तस्करांचा पाठलाग करीत असताना, वाहनाच्या मागच्या बाजूने पोलीस वाहनाला कट लागल्याने पोलीस वाहनाने दोन ते तीन वेळा पलटी मारली. सुदैवाने यात बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी इजा झाली नसून, फक्त किरकोळ जखम झालेली आहे.सदरची घटना पोलीस ठाणे दिघोरीच्या अगदी १०० मीटर अंतरावर असलेल्या साकोली लाखांदूर हायवे वर रात्री ९:०० वाजताच्या सुमारास घडली.
जनावरांचे तस्करीची माहिती नियंत्रण कक्षातून होताच दिघोरी ठाण्याचे ठाणेदार आशिष गद्रे यांनी आपले कर्मचारी पो.हवा. नवनाथ शिदने, पो.शी.उमेश वलके,अजित शेळके व पोलीस वाहन चालक आकाश सोनवणे यांना तस्करी रोखण्यासाठी सदरच्या प्रांत लोकेशनच्या दिशेने पाठविले. त्या अनुषंगाने पथक दिघोरी बोंडगाव रस्त्यावर तस्कराच्या वाहनाची वाट बघत होते. पोलीस गाडी दिसतात बिना नंबर प्लेटच्या दोन्ही पिकअप वाहनांनी दिघोरी लाखांदूर रस्त्यावरून धूम ठोकली. यात वाहनाच्या सिनेस्टाईल पाठलाग करीत असताना अचानक तस्कराच्या गाडीच्या मागील बाजूची कट पोलीस वाहनाला लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. व पोलीस थानेलगत अगदी १०० मीटर अंतरावर पोलीस वाहनाने दोन ते तीन पलट्या मारल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नसून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली. सदर घटनेचा तपास ठाणेदार आशिष गद्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, अज्ञात बिना नंबर प्लेटच्या दोन्ही पिकप वाहनावर कलम १२५अ, २८१ भारतीय न्यायसंहिता ११/५ प्राण्यांची जबरी वाहतूक व मोटर अॅक्ट कायदा १८४ अनंवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.