पदमपुर/फुटाणा शिवारातील घटना...
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी दि.१५ डिसेंबर २०२४
देवरी तालुक्यातील फुटाणा/पलानगाव मार्गावरील पदमपुर गाव शिवारात दोन दुचाकीची अमोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी झाला आहे. कलीराम नेताम (४५) राह. पदमपुर असे मृतकाचे तर, विशाल मडावी (१९) राह. कोसबी असे जखमीचे नाव आहे. ही घटना दि.१४ डिसेंबर २०२४ दुपारी २:०० वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, तालुक्यातील पदमपुर येथील कलीराम नेताम हा दुचाकी क्रमांक एम.एच.३५ बी ७६२९ ने गावाकडून बाहेरगावी जाण्यासाठी निघाला. तर कोसंबी येथिल विशाल मडावी हा युवक दुचाकी क्र. सी.जी.०८आर.२११५ ने सिंदिबिरी कडून पदमपुर कडे येत होता. पदमपुर गाव शिवारातील वळणावरील पुलाजवळ दोन्ही दुचाकीची अमोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत कलीराम नेताम यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल मडावी हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी चिचगड ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. प्राणांतिक अपघातामुळे पदमपुर गावात एकच शोककळा पसरली आहे. पुढील तपास चिचगड पोलीस करीत आहे.