छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडुळ गावातील हृदयद्रावक घटना
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
छत्रपती संभाजीनगर, दि.१७
छत्रपती संभाजीनगरमधून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. एक आठ वर्षाचा आणि दुसरा चार वर्षांचा मुलगा होता. दोन्ही भाऊ खेळत असताना विहिरीत पडले आणि बुडून त्यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ गावात ही ह्रद्रयद्रावक घटना घडली आहे. प्रणव कृष्णा फणसे (४ वर्ष) आणि जय कृष्णा फणसे (८ वर्ष) असं मृत्यू झालेल्या दोन सख्या भावांची नावं आहेत. शेतामध्ये हे दोघे भाऊ खेळत होते. खेळता खेळता ते विहिरीत पडले, त्यानंतर आरडाओरडा सुरू झाला. विहिरीला पाणी जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचवून दोन्ही भावांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक कदम, आणि कर्मचारी छगन सलामबाद, रितेश कसुरे, विशाल घरडे, कमलेश सलामबाद, रावसाहेब वाकले, रावसाहेब जाधव आणि चालक रामदास राऊत यांनी घटनास्थळावरून विहिरीतून रेस्क्यू करत दोन्ही भावांना बाहेर काढून गावचे सरपंच आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. एकाच कुटुंबातील दोन चिमुकले गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर संपूर्ण पंचक्रोशीत या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे.