पट्टेदार वाघाने नरडीचा घोट घेत, वृद्धाला केले ठार.!

Shabd Sandesh
0
कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत पिटेसूर जंगलातील घटना..
     शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
तुमसर, दि.०६
   तुमसर तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पिटेसुर मासेमार जंगल परिसरात  लागून असलेल्या सोरणा तलावात मासेमारीसाठी गेला असता, जंगलात दबा धरून बसलेला नरभक्षी वाघाने मासेमारी करणाऱ्यावर हल्ला चढवीत त्याच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना ०४ डिसेंबर २०२४ रोजी सायं.६:०० वाजे दरम्यान घडली. लक्ष्मण मोहनकर राह. पीटेसुर ता. तुमसर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
     घटनेच्या दिवशी बुधवारी लक्ष्मण मोहनकर हा सायं.४:०० ते ५:०० वाजे दरम्यान पिटेसुर जंगल परिसरात सोरणा तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता.दरम्यान,घरी परत येत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने लक्ष्मण मोहनकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत, त्याच्या नरडीचा घोट घेत जागीच ठार केले. 
घटनास्थळी पट्टेदार वाघाने लक्ष्मण यांच्या शरीराचा अर्धा भाग खाल्ला आहे तर,पाय हा वेगळा पडला होता.
      
     दरम्यान रात्री उशिरापर्यंत लक्ष्मण मोहनकर हा घरी परत न आल्याने, त्याची शोधाशोध घेण्यात आली.परंतु,तो कुणालाच दिसेनासा झाला. शेवटी गावातील नागरिकांनी लक्ष्मण हा जंगल परिसरात सोरना तलावाकडे गेला असल्याचे सांगितले. त्यावेळी गावातील नागरिकांनी जंगलाकडे धाव घेत लक्ष्मण याचा शोध घेतली असता, चक्क लक्ष्मण मोहनकर याचा मृतदेह वाघाने ठार केलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान सदर घटनेची माहिती कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांना देण्यात आली. कांद्री येथील वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व चमू पिटेसूर जंगलात रात्री फौज फाट्यासह दाखल झाले. त्यांना वाघ हा लक्ष्मण मोहनकर यांच्या मृतदेहाजवळ शिकार करून बसलेला आढळून आला. दरम्यान संबंधित वन कर्मचारी व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जंगल परिसरात जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाघाने ठार केलेल्या लक्ष्मणच्या मृतदेहाजवळ पोहोचले. मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रात्री उशिरापर्यंत मोहाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले. लक्ष्मण मोहनकर याची जंगलालगत शेती आहे. ते गावात मासेमारीच्या व्यवसाय सुद्धा करीत होते अशी माहिती आहे. सध्या जंगल व्याप्त भागात मानव व वन्यप्राणी संघर्ष वाढत चालला. याकडे संबंधित विभागाने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. मृतक लक्ष्मण मोहनकर यांच्या मृत्यु पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)