शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.०८
देवरी तालुक्यातील ग्राम शेडेपार येथे सध्या माकडांचा हैदोस सुरू असून,कौलारू घरांचे अतोनात नुकसान होत आहे. या माकडांना पिटाळून लावण्यास गेले असता, ते उलट आक्रमण करीत आहेत. याबाबत देवरी वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेडेपार येथील सामाजिक कार्यकर्ता अरविंद उके यांनी केली आहे.
शेडेपार येथे मागील दोन महिन्यापासून माकडांनी गावात उच्छाद मांडला आहे. वानरांचे कळप घरांवर उड्या मारत असल्याने, घरावरील कवेलू फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. महागडे कवेलु खरेदी करून लाकूड फाट्यांनी छताची नेहमी दुरुस्ती करणे गरीबांच्या जीवावर आले आहे. एवढेच नव्हे तर, घरातील अन्न पदार्थ सुद्धा माकडे पळवून नेतात. परसबागेतील वांगी, टमाटर व इतर भाजीपाल्याची नासधुस करतात.महिला व लहान मुलेच नव्हे तर पुरुषांवर सुद्धा माकड आक्रमण करतात. प्रसंगी चावाही घेत असल्याने शेडेपार वाशी भयभीत झाले असून, लगतच्या गावातील गावकरीही त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी घरावर ताडपत्र्या मांडल्यात, परंतु काही ठिकाणी छत पडले आहेत.वनपरिक्षेत्रअधिकारी तसेच जिल्हा वनअधिकारी यांनी शेडेपार तसेच लगतच्या गावातील माकडांच्या टोळ्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे व गावातून माकडांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच त्वरीत नुकसानभरपाई द्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अरविंद उके सह गावकऱ्यांनी केली आहे.