माती परीक्षणातून शेतीची तब्येत सुधारण्याची गरज
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी,दि.१६ डिसेंबर २०२४
मनुष्य आपल्या शरीराची काळजी घेतो. साधे पोट दुखले तरी डॉक्टरांकडे जातो. परंतु, तसे काळजी आपण शेतीची घेत नाही. रासायनिक खताच्या वारेमाप वापराने जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.त्यामुळे अनेक संकटे उभे ठाकले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी माती परीक्षण करून शेतीची तब्येत सुधारण्याची गरज आहे.
माती परीक्षण केल्यास, पिकांना किती प्रमाणात खतांची मात्रा घ्यायची हे कळते. जमिनीतील विद्रावक क्षार आणि निर्देशांक आवश्यक ठरते.आपण ज्या शेतीतून पिके घेतो त्या जमिनीच्या प्रकार कोणता आणि त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत हे जाणून घेणे गरजेचे असते. त्यातून शेतात घेण्यात येणारे पीक कोणते हे नक्की करता येते. त्यामुळे कमी खर्चात उत्पन्नात वाढ होते. यातून पिकांना द्यावयाच्या मात्रा निश्चित करता येतो. माती परीक्षण हे जमिनीतील अंगभूत रासायनिक व जैविक विश्लेषणासाठी आवश्यक आहे.
अठरा अन्नद्रव्याची गरज
पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्याची आवश्यकता असते. यामध्ये सामू,विद्युत वाहकता, चुनखडी, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालस, फेरस, झिंक, मॅग्नीज, सल्फर, बोरॉन आधी घटकाचा समावेश असतो. मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर केला जात असल्याने पोत बिघडत आहे. त्यामुळे शेतीमध्ये आवश्यक असणारे जीव जंतू मृत पावत आहेत.