शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
सडक अर्जुनी,5 डिसेंबर 2024
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, शेंडा येथे आय.पी.एस अधिकारी म्हणून निवड झालेल्या काजल चव्हाण यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणेची लहर निर्माण झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शिक्षक श्री. पी. आर. शंभरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बी. टी. चव्हाण उपस्थित होते. इतर मान्यवरांमध्ये के. बी. चव्हाण, के. के. पारधी, कु. पी. एम. मरस्कोल्हे, यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक संजय मानवटकर यांनी केले.
काजल चव्हाण यांनी त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढ इच्छाशक्तीच्या माध्यमातून यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत “यशस्वी होण्यासाठी धैर्य, निर्धार आणि स्पष्ट दृष्टिकोन आवश्यक आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि नेहमी उंची गाठण्याचा प्रयत्न करा,” असे त्यांनी सांगितले. वर्ग 12 विज्ञान ची विद्यार्थीनी दिव्यता पंधरे हिने त्यांना इंग्रजीतून UPSC च्या तयारी बद्दल प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शना नंतर त्यांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसोबत हितगुज साधून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच इतर स्पर्धा परीक्षा, BARTI मार्फत चालविण्यात येणारे उपक्रम, विविध शिष्यवृत्त्या यांच्या विषयी चर्चा केली.
त्यांचे मार्गदर्शक आणि दिशादर्शक असलेले व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बी. टी. चव्हाण यांनी निवृत्तीनंतर आदिवासी विकास विभागामार्फत 2003 ते 2006 पर्यंत देवरी प्रकल्पातील शिक्षक प्रशिक्षणाचे केंद्राध्यक्ष म्हणुन काम पाहिले होते. आपल्या नातीच्या मेहनत व जिद्दीची कल्पना आपल्या मोलाच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांना अभ्यास आणि कष्टाचे महत्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप उच्च माध्यमिक शिक्षक नितीन खोडे यांनी आभार प्रदर्शन करून केला. त्यांनी काजल चव्हाण आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साध्य करण्याची उर्मी जागवली.