उदरनिर्वाह करावी की वीज बिल भरावे
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क
देवरी, दि.१४ डिसेंबर २०२४
ग्रामीण भागात पाहिजे तेवढा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे, ग्रामीण भागातील नागरिकांची परिस्थिती कमकुवत झाली आहे. कमावणे कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती ग्रामीण भागात उद्भवली आहे. अशाच कित्येक आर्थिक समस्या ग्रामीण भागात समोर येत आहेत. विज बिल यातीलच एक समस्या आहे. आज सर्वसामान्य कुटुंबात महावितरण चे वीज मीटर लावलेले आहे. वीज दरात खूप झपाट्याने वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे पोट भरायचे की वीज बिल भरायचे अशी अवस्था ग्रामीण भागातील लोकांची झाली आहे.
कोरोनाच्या महामारीतून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक संकटामुळे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता हाताला सुद्धा बरोबर रोजगार नाही त्यामुळे पोटाची खळगी भरताना नाकी नऊ आलेल्या सर्वसामान्यांना वाढत्या वीज बिलाचा भार डोईजड झाला आहे. बिल कसे भरायचे? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य माणसाच्या हातात पाहिजे तेवढा पैसा राहत नसल्याने घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल भरावे तर कसे असा प्रश्न त्यांना निर्माण होत आहे. राज्य शासन व महावितरणाद्वारे विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त वीज निर्मिती होत असूनही येथिल जनतेला महागाईचा भाग सोसावा लागत आहे. वीज बिलात विविध प्रकारचे शुल्क जोडून तसेच वीज चोरीची रक्कम ग्राहकाच्या वीज बिलात जोडली जात आहे. महावितरणाच्या हा प्रकार अन्यायकारक असल्याचे दिसून येत आहे. गोरगरीब मजूर शेतकरी व सर्वसामान्यांचा विचार करून सरकारने विजेचे वाढीव दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे.
रोजगार नाही, बिल भरताना निघतोय दिवाळा..
ग्रामीण भागात अगोदरच रोजगाराची कमतरता आहे. आणि अशातच जास्त वाढीव विज बिल भरणे म्हणजे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडणे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वाढीव शुल्क जोडले जात असल्याने, बिलाचा भार सोसण्यात सर्वसामान्य माणसाच्या दिवाळा निघत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी जगावे तरी कसे?. महागाईच्या या काळात प्रत्येक वस्तूचे दर वाढत चालले आहे. आणि त्यातच क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुखावले आहेत. त्यामुळे विजेचे दर लवकरात लवकर कमी करण्याच्या सूर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आहे.