शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी,१५
गेल्या दोन दिवसापासून तापमानात मोठी घट झाली असून, थंडीने जोर पकडला आहे. कडाकाच्या थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दोन दिवसापासून तापमान घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. १२ डिसेंबर रोजी ११ अंश असलेल्या तापमानात पुन्हा घट होऊन दि.१४ डिसेंबर रोजी किमान ९ अंशावर पारा घसरलेला आहे. पुन्हा थंडीचा जोर वाढणार असून, शीत लहरी प्रभावित होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गोंदिया जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अंगाला झोंबणाऱ्या गार बोचऱ्या वाऱ्यासह थंडीमुळे नागरिकांना चांगली हुडहूडी भरली असून ग्रामीण व शहरी जनजीवन प्रभावित झाले आहे. नागरिक बचावासाठी शेकोट्याचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याचे जाणवत होते. त्यादरम्यान पावसाने जोरदार मुसंडी मारली. ढगाळ वातावरण निवडल्याने मागील दोन-तीन दिवसापासून थंडीने जोर पकडला आहे. दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने येत्या काही दिवसात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसा अगोदर ११अंश असलेले तापमान दि.१४ डिसेंबर रोजी ८.८अंशवर आले आहे. जिल्ह्यात कमाल २५ व किमान ८.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या थंडीमुळे सायंकाळी रस्ते सामसूम होत आहेत.वर्दळीच्या रस्त्यावरील गर्दी रोडावत आहे.ग्रामीण भागात थंडी अधिक जाणवत असल्याने ग्रामीण जनता शेकोटीचा आधार घेत आहेत. तर शहरवासी उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडत आहेत. चांगलीच हुडहुडी भरत आहे.