शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.०८ डिसेंबर २०२४
खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.किडीच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे उत्पादनात प्रचंड घट झाली असल्यामुळे, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून पलायन थांबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेली मजूर प्रधान कामे लवकरात लवकर सुरू करावी. अशी मागणी जॉब कार्डधारक मजुरांनी केली आहे.
ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून शंभर दिवस रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती करण्यात आली.योजना यशस्वी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. चालू खरीप हंगामात रोग आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे धान उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने, दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करणे प्रशासनाची जबाबदारी असल्यामुळे लवकरात लवकर मग्रारोहायोची मजूर प्रधान कामे सुरू करावी. अशी मागणी तालुक्यातील जॉब कार्डधारक मजुरांनी केली आहे.
मजुरांना कामाची गरज
खरीप हंगाम आटोपतीच्या मार्गावर असून, रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे.देवरी तालुक्यातील उद्योगधंदे मोडकळीस आल्यामुळे रोजगारासाठी युवकांचे परप्रांतात स्थलांतर होत आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योग बेरोजगारांना रोजगार देण्यात असमर्थ आहे.परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. केंद्र शासनातर्फे दरवर्षी मजुरांच्या हाताला काम दिले जाते. मात्र, यावर्षी अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे मजुरांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने तालुक्यात रोहयोची कामे सुरू करावी. अशी मागणी आहे.