डिपॉझिट ठेव सह इतर खाते असुरक्षित असल्याच्या अफवेने उडाला गोंधळ
बँकेच्या अध्यक्षांच्या घराला कुलूप
विविध अफवेने शहरात फुटले चर्चेचे पेव
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
किशोर कांबळे प्रतिनिधी दिग्रस, दि.१३
दिग्रस शहरातील एका अर्बन निधी बँकेचे जवळपास एक महिन्यापासून ग्राहकांनी बँकेत जमा ठेवलेल्या रक्कमेचा विड्रॉल होत नसल्याने बँकेत एक महिन्यापासून दररोजच गर्दी उसळली होती. जमा ठेव रक्कम परत मिळत नसल्याने ग्राहक निराशावस्था मध्ये दिसत आहे. अशातच बँकेचे अध्यक्ष यांनी फ्रॉम हाऊस, चारचाकी सह त्यांचा पेट्रोल पंप विकल्याची चर्चा दिग्रस शहरात पसरताच खातेदाराची धांदल उडाली. या चर्चेमुळे बँकेचे ठेवीदार चक्रावून गेले त्यांना बँक डबघाईस आल्याच्या अफवेने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे ग्राहक बँकेत असलेली आपली ठेव रक्कम काढण्यासाठी दररोज चकरा मारत होते.
तेव्हा बँकेचे अध्यक्ष यांनी निंभा येथील फार्म हाऊस येथे बँक खातेदाराची मिटिंग बोलावून आपली ठेव रक्कम सुरक्षित असल्याची ग्वाही देत दोन महिन्यात ती आपल्याला देण्यात येईल असे आश्वाशीत केले होते. तसेच बँकेत २९ कोटीचा टर्न असून १६ कोटी कर्ज वाटप झाल्याचे त्या मिटिंग मध्ये बोलले होते. यावेळी बँक खातेदारांना व उपस्थित बँक कर्मचाऱ्यांना जेवण देऊन त्यांना दिलासा देत समाधान केले होते. परंतु अनेकांचे लाखोंच्या घरात या बँकेत ठेवी असल्याने ग्राहकांचा या बँकेवरील विश्वास उडत चालल्याने ठेव रक्कमेसाठी ठेवीदारांनी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी केली. तेव्हा ग्राहकांना 'आज या, उद्या या' असे उत्तर मिळत राहिले. परंतु त्यांना ठेव रक्कम मिळत नसल्याने ते संतापले होते.
९ डिसेंबर २०२४ रोजी त्या बँकेच्या अध्यक्षांच्या घरी ठेवीदार आपल्या ठेव रक्कमेसाठी पोहचले असता त्यांच्या घराला कुलूप लावून दिसल्याने सर्वच अचंबीत झाले. तेव्हा अनेक ठेवीदार व बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्यांची शंका बळावली. तेव्हा ग्राहक व कर्मचाऱ्यांनी या घटनेची तक्रार देण्यासाठी दिग्रस पोलिसात धाव घेतली. परंतु आपण तक्रार केल्यास आपली रक्कम मिळणार नसल्याच्या धास्तीने कोणीच तक्रार दिली नाही. शेवटी आज रोजी बँक जनरल मॅनेजर व ठेवीदाराने पोलिसात तक्रार केली आहे.