शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दी.१२ डिसेंबर २०२४
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे दुर्लक्ष..
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जुन्या वजनकाट्यांऐवजी डिजिटल वजन काटे वापरण्याच्या सूचना वारंवार देण्यात आल्या आहेत, तसेच डिजिटल वजन काटेही योग्य वजन दाखवतात की नाही ते तपासणे जिल्हा प्रशासनचे काम आहे.पण, डिजिटल वजन काटे वापरणे सोडाच साधे वजन काटेही जिल्ह्यात जुन्या पद्धतीने वापरले जात आहेत. या वजन काट्यांवर वजनाऐवजी दगड मांडणे, एखादी वस्तू मांडणे असे प्रकार केले जातात. तर काही ठिकाणी लोहचुंबक लावून मापातच पाप केले जात असल्याने चित्र सर्रास सुरू आहे.
जिल्ह्यात चायनामेड वजनकाट्याचे प्रमाण वाढले आहे. यातून सर्वसामान्य ग्राहकांचे फसवणूक होत असल्याने जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर वजनकाटे न वापरण्याचे आवाहन केले आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी येतात मात्र जर असे गैरप्रकार होत असतील तर त्याविरुद्ध तक्रार कशी व कोठे करायची, त्याचीही सोय असावी असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
चायना मेड वजनकाट्याचे वाढते प्रमाण
व्यापारी, विक्रेते यांनी अनधिकृत, चायनीज वजनकाटे वापरण्यवर बंदी असूनही,याप्रकारचे वजन काटे बाजारामध्ये वस्तूची विक्री करण्यासाठी कित्येक विक्रेत्यांजवळ उपलब्ध आहेत. मालाचे योग्य वजन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक वजनकाटे उत्पादक व विक्रेत्यांचे नुकसान होते. शिवाय राज्य सरकारचा महसूलदेखील बुडत आहे.
दुकानदारांकडून मापात पाप
दरवर्षी वजनकाटे अधिकृत दुरुस्तक परवानाधारकांकडून छापून घ्यावे लागते. पूर्वी झीज होणारे लोखंडी वजनांमध्ये शिसे धातू टाकून वजन वाढवले जायचे. यावर वैधमापन शास्त्राचा अधिकृत शिक्का असे. यास वजन छापणे असे म्हटले जात असे. परंतु अलीकडे इलेक्ट्रॉनिक वजन यंत्र बाजारात आली आहेत. या यंत्रांची दुरुस्ती करण्याकडे विक्रेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. वजन करताना प्रत्येक किलोमध्ये ५० ते १०० ग्रॅम धान्य कमी भरले तरी दिवसाला काही किलोमध्ये दुकानदारांकडे धान्य जमा होते. यातून दुकानदारांना जादा पैसे कमावता येतात; मात्र हे सर्व प्रकार बेकायदेशीर असून ग्राहकांची लूटमार करणारे आहेत.
ग्रामीण भागात माहितीचा अभाव
ग्रामीण भागातील ग्राहक किरकोळ स्वरूपात साहित्याची खरेदी करीत असतात. दुकानदारही घाईत असतो, तो पटापट वजन करून साहित्य देत असतो. अनेकवेळा काटा बरोबर आहे की नाही, याकडे त्यांचे लक्ष जात नाही. जिल्ह्यात चायनामेड डिजिटल वजनकाटे वापरण्याचेही प्रकार वाढत आहेत. या वजनकाट्यांमध्ये वजनाच्या प्रमाणात बदल करणे शक्य असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असते. अशा चायनामेड वजनकाट्यांना शासनाची मान्यता नाही. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांना याबद्दल माहिती नसल्याने कोणाकडे तक्रार करायची हेच समजत नाही.