शब्दसंदेश न्यूज नेटवर्क
कोरची प्रतिनिधी, दि.३०
कोरची तालुक्यातील दुर्गम परिसरातील आंबेखारी गावानजीकच्या जंगलात जमिनीत अर्धवट अवस्थेत पूरलेला एका व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान सांगाडा बघणाऱ्या महिलेने तो सांगाडा आपल्या मुलाच्याच असल्याची शंका व्यक्त केली आहे.
आंबेखारी गाव कोरची पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. आज आंबेखारी येथील दुलमाबाई कडयामी ५० वर्षे महिला केरसुनी बनविण्यासाठी जंगलात गेली होती. तिला जमिनीत अर्धवट पुरून ठेवलेला एक मानवी सांगाडा आढळून आला. तिने गावकऱ्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना कळविले.त्यावर तहसीलदार प्रशांत गड्डम, पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, वैद्यकीय अधिकारी श्रेया बुद्दे यांनी घटनास्थळी जाऊन सांगाडा ताब्यात घेतला.
यंदाच्या जुलै महिन्यात आंबेखारी येथील महेश कडयामी हा मयाल घाट येथे अक्षय मडावी यांच्या समवेत मासेमारीसाठी गेला होता.परंतु,नंतर तो घरी परतलाच नाही. तेव्हापासून त्याच्या शोध घेणे सुरू आहे. विशेष म्हणजे आज महेशची आई दुलमाबाई ही जंगलात केरसुनीसाठी बनविण्याचे गवत तोडण्यासाठी जंगलात गेली असता, तिलाच हा सांगाडा आढळला. हा सांगाडा महेशचाच असावा. अशी शंका तिने पोलिसांकडे केली आहे.
जंगलात आढळलेल्या सांगाड्याचे डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. युवकाचा खून करून जमिनीत पुरल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी कोरची पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.