देवरी तालुक्यातील आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्र असलेला अंभोरा ते पिंडकेपार या रस्त्यावरून वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कित्येक वर्षापासून सदर मार्ग निदर्शनात असूनही,संबंधित विभागाने तसेच जनप्रतिनिधी ने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील अंभोरा ते पिंडकेपार या २ कि.मी. रस्त्यावरून अनेक नागरिक रात्रंदिवस ये-जा करीत असतात. या मार्गावरून शेतकरी शेतातील मालाची ने-आण करीत असतो. विद्यार्थी ज्ञानार्जन करण्याकरीता याच मार्गाचा अवलंब करीत असतात. मजूर वर्ग कुटुंबाची खळगी भरण्याकरिता मोलमजुरी करण्याकरिता याच मार्गावरून ये जा करतात.त्याचप्रमाने,सदर मार्गावरून अनेक प्रवाशांचा प्रवास सुरू असतो.
कित्येक वर्षाआधी अंभोरा ते पिंडकेपार रस्त्याचे फक्त खडीकरण करण्यात आले होते. परंतु, रस्ता पक्का न झाल्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी उखडून जागोजागी खड्डे पडल्यामुळे, नागरिकांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून वाहनाने तर सोडाच,साधे पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे.ग्रामस्थांनी क्षेत्रीय जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाला अनेकदा सदर रस्त्याची बाब निदर्शनात आणून दिली असता,याची अजूनही दखल घेतली नाही. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदर रस्त्यावरून प्रवास करताना एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर,याची जबाबदारी कोण? घेणार.असा प्रश्न ग्रामस्थांसह प्रवाश्यांसमोर निर्माण झाला आहे.
साहेब.!रस्त्याची दुरावस्था एकदा,बघा..ना.!
गेल्या चोवीस वर्षापासून तीन गावातील लोकांना धरून चालणारा अंभोरा ते पिंडकेपार रस्ता अश्रू ढाळत असून,सदर मार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उखडलेल्या गिट्टीवरून कुणा सामान्यांचा अपघात कधी होईल, याचा अंदाज बांधता येत नाही. सदर रस्त्यावरून फक्त निवडणुकीदरम्यान पुढारी गावात येऊन आश्वासनावर भर पाडतात.परंतु,एवढे दिवस लोटूनही,एकही पुढारी गावातील लोकांच्या विकासाकरिता पुढं न येता,लोकांना मरणाच्या दारात आणून उभे केले आहे. सदर मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासन तसेच पुढाऱ्यांना केले आहे.